मधुमेहाची कारणे, लक्षणे आणि प्रकार

04 October, 2021

मधुमेहाची कारणे, लक्षणे आणि प्रकार


Diabetes
नमस्कार,

जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालानुसार १९८० मधे मधुमेहाचे रुग्ण १० कोटीं होते आणि २०१४ च्या अहवालात हाच आकडा वाढून तो ४२ कोटींच्या वर गेल्याचे दिसून आले आहे.मधुमेह हा एक गंभीर आजार म्हणून संपूर्ण जगात वाढत आहे. म्हणून आज आपण पाहू किती प्रकारचे मधुमेह असतात, मधुमेह होण्याचा संभव कोणत्या लोकांना अधिक असतो आणि मधुमेहाची लक्षणे कोणती? जेव्हा आपण अन्न खातो तेव्हा आपण खाल्लेल्या अन्नाला आपले शरीर ग्लुकोज मधे कन्व्हर्ट करते जे आपल्या रक्त प्रवाहात मिसळून संपूर्ण शरीराला उर्जा देण्याचे काम करते. आपल्या शरीरात स्वादुपिंड नावाचा एक अवयव आहे ज्यात इन्सुलिन तयार होते,हे इन्सुलिन ग्लुकोजला नियंत्रित करते. मधुमेह असणाऱ्या लोकांमध्ये हेच इन्सुलिन योग्य प्रमाणात तयार होत नाही आणि ग्लुकोज पातळी वाढून मधुमेह होतो. याचा दुष्परिणाम मेंदू, मज्जासंस्था,हृदय, किडनी यावर होताना दिसतो.

मधुमेहाचे प्रकार
 • टाईप १ मधुमेह:- यामध्ये शरीरातील स्वादुपिंडामधे बीटा सेलच्या विरुद्ध एक अँटिबॉडी तयार होते,ज्यामुळे इन्सुलिन तयार होणे थांबते आणि ग्लुकोज पातळी वाढते. ह्या प्रकारचा मधुमेह जास्त करून लहान मुलांमध्ये दिसून येतो, काही वेळा मोठ्या वयाच्या लोकांमध्ये पण हा मधुमेह प्रकार आढळतो.
 • टाईप २ मधुमेह:- हा सर्वात कॉमन प्रकार आहे. ९०% हुन अधिक रुग्ण जगभरात या प्रकारच्या मधुमेहाने त्रस्त आहेत.यामध्ये इन्सुलिन रेसिस्टंस, इन्सुलिन सेन्सिटिव्हीटी कमी होणे आणि इन्सुलिन कमी प्रमाणात तयार होणे ही तीन मुख्य कारणं असतात. ह्याप्रकारचे रुग्ण सामान्यतः मध्यम वयातील लोकांमध्ये दिसून येते परंतु आजकाल वजन वाढणे आणि लहान वयातील ओबेसिटी यामुळे लहान मुलांना सुद्धा याप्रकारचा मधुमेह होताना दिसतो.
 • जेस्टेशनल मधुमेह:- गर्भवती महिलांमध्ये ७ व्या महिन्यात या प्रकारचा मधुमेह आढळून येतो.
 • खूप कमी प्रमाणात म्हणजेच एकूण आकडेवारीच्या १-२% हे मधुमेह प्रकार आढळतात ते म्हणजे निओनेटल मधुमेह आणि पॅनक्रियाटिक मधुमेह, मोडी,इंडोक्राइन सिंड्रोम.
कोणत्या लोकांना मधुमेह होण्याचा धोका अधिक असतो ?
 • टाईप १ मधुमेह :- ज्या रुग्णाच्या घरातील जवळच्या व्यक्ती जसे आई-वडील, भावंडे यांना मधुमेह असेल तर अशा लोकांना मधुमेह असू शकतो. शरीरात अँटिबॉडी असणे. फार कमी वेळा आसपासचा परिसर आणि आपण कोणत्या ठिकाणी राहता ते ठिकाण यामुळे देखील मधुमेह होऊ शकतो याचे उदाहरण म्हणजे फिनलंड आणि स्वीडनमध्ये जास्त प्रमाणात आढळतो.
 • टाईप २ मधुमेह:- फॅमिली हिस्ट्री असलेले लोक, वजन खूप जास्त असणे, जास्तवेळ बसून काम,कमी शारीरिक हालचाल,४५ पेक्षा अधिक वय, PCOS असलेल्या महिला, आधीपासून काही आजार असणे जसे रक्तदाब,हृदय विकार, कोलेस्टेरॉल, पॅरालेसिस ई त्रास असणे अशा लोकांना मधुमेह होण्याचा संभव अधिक असतो.
 • डिप्रेशन किंवा तणाव ज्या लोकांना जास्त असतो अशा लोकांना लवकर मधुमेह होऊ शकतो. त्याच प्रमाणे ज्यांच्या त्वचेवर काळे डाग किंवा पट्टे दिसतात त्यांना भविष्यात मधुमेह होऊ शकतो.
मधुमेहाची लक्षणे
 • पोलीयुरिया :- जास्त वेळा मूत्र उत्सर्जन करणे
 • पोलीडिप्सीया :- खूप जास्त भूक लागणे.
 • पोलीफेजिया :- खूप जास्त तहान लागणे.
 • अतिरिक्त वजन कमी होणे
 • धुरकट दिसणे
 • खूप जास्त थकवा जाणवणे
 • जखम भरून यायला वेळ लागणे
 • वारंवार इन्फेक्शन होणे.
 • हाताला आणि पायाला मुंग्या येणे किंवा झिनझीनी येणे.

मित्रांनो बऱ्याचदा मधुमेह असताना लक्षणे दिसून येत नाहीत तेव्हा रुग्ण डॉक्टरकडे आला की त्याची तपासणी करताना डॉक्टर सर्व अभ्यास करतात आणि मग मधुमेहाचे निदान होते. ज्यावेळी लोकांना लक्षणे दिसून येते नाहीत पण त्यांना मधुमेह आहे हे समोर येते तेव्हा त्यांचा विश्वास बसत नाही पण आम्ही डॉक्टर त्यावेळी त्यांना समजवून सांगतो की मधुमेह आहे म्हणजे त्याची लक्षणे दिसतीलच असे नाही.तेव्हा आपण आपली काळजी घ्या आणि काहीही शंका आली तर जरूर डॉक्टरांना भेटा आणि योग्य सल्ला घ्या. पुन्हा भेटू नवीन विषय घेऊन

धन्यवाद,

स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि हसत राहा
Go Back

Make Appointment

Do you find the process of getting examined intimidating?
Choosing a right clinic for the matter, Let us take care of everything.