मधुमेह नियंत्रणातील महत्वपूर्ण घटक

17 September, 2020

मधुमेह नियंत्रणातील महत्वपूर्ण घटक


आज आपण " मधुमेह नियंत्रण " याविषयी थोडी चर्चा करूया.आज भारतासह जगभरात अनेक व्यक्ती मधुमेह या आजारानी पीडित आहेत,मधुमेह होण्यासाठी अनेक कारणे आहेत.औषध उपचार आणि त्याबरोबर अजून काय उपाय करता येईल जेणेकरून मधुमेह नियंत्रणात ठेवता येईल ते पाहू. यासाठी काही घटक आहेत त्यावर एक नजर टाकू. काही सोपे उपाय केले तर आपण या समस्येवर लवकर नियंत्रण मिळवून भविष्यातील गुंतागुंत टाळू शकतो.

शारीरिक हालचाल

शारीरिक हालचाल,व्यायाम हे मधुमेह नियंत्रणात अतिशय महत्वपूर्ण भूमिका बजावते,हे काही अभ्यासातून समोर आले आहे. यासाठी रोज नियमित व्यायाम,योगासने,प्राणायाम,चालणे अशा सोप्या गोष्टींचा समावेश आहे. रोज नियमित २०-३० मिनिटे चालले तर त्यामुळे आपल्या शरीराच्या सर्व स्नायूंची हालचाल होते आणि त्यामुळे मधुमेह नियंत्रणास मदत होते तेव्हा मधुमेह कोणत्याही प्रकारचा असेल तरी नियमित चालणे हे खूप महत्वाचे आहे. चालण्याने आपणास आनंद होतो आणि तणाव कमी होतो, चालण्यामुळे रक्ताअभिसरण सुधारण्यास मदत होते.रक्तदाब कमी होतो,त्वचा आणि श्वसन कार्य सुधारते असे अनेक फायदे चालण्याचे आहेत.

मधुमेह आणि आहार

मधुमेह असण्याचा अर्थ असा नाही की आपल्याला आपल्या आहारातून साखर पूर्णपणे काढावी लागेल.साखर असलेले पदार्थ कमी प्रमाणात खावेत जेणेकरून रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवता येईल. प्रोटीन ग्लूकोजमध्ये मोडत नाहीत, त्यामुळे ते रक्तातील ग्लुकोजची पातळी थेट वाढवत नाहीत म्हणून मधुमेह असणाऱ्या लोकांनी जास्त प्रोटीनयुक्त आहार घ्यावा. शरीराच्या बहुतेक कार्यांसाठी पाण्याची आवश्यकता असते आणि दररोज शरीराची आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक असते. पाणी हे सर्वोत्तम पेय आहे आणि आपल्या रक्तातील ग्लुकोजच्या पातळीवर त्याचा परिणाम होत नाही.त्यामुळे जास्तीत जास्त पाणी प्यावे. चरबीमध्ये सर्व प्रकारची उर्जा (कॅलरी) असते. जास्त चरबीयुक्त पदार्थ खाल्ल्याने तुमचे वजन वाढते, त्यामुळे रक्तातील ग्लुकोजच्या पातळीचे व्यवस्थापन करणे अधिक कठीण होते. आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी काही चरबी आवश्यक असते परंतु आपण निवडलेल्या चरबीचा प्रकार त्यामध्ये महत्वाचा असतो.कमी कार्बोहायड्रेट आहार मधुमेह व्यवस्थापनास मदत करू शकतो.जर आपण नियमित जेवण खाल्ले आणि दिवसभर आपल्या कार्बोहायड्रेटचे योग्य व्यवस्थापन केले तर आपण आपल्या रक्तातील ग्लुकोजच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ न करता आपली उर्जा पातळी योग्य प्रमाणात ठेवू शकतो.कमी जी.आय. कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ हळूहळू रक्तप्रवाहात प्रवेश करतात आणि रक्तातील ग्लुकोजच्या पातळीवर त्याचा कमी प्रभाव पडतो त्यामुळे उत्तम संयोजन म्हणजे उच्च प्रमाणात फायबर आणि कमी जी.आय. कार्बोहायड्रेट्स खाणे.

वजन नियंत्रित करणे

वजन जास्त असणे किंवा अतिरिक्त वजन वाढणे हे मधुमेहाचे एक लक्षण आहे. जर आपल्याला मधुमेह नियंत्रणात ठेवायचा असेल तर आपले वजन नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी रोजच्या आहारात बदल करणे गरजेचे आहे हे बदल कसे असावेत यासाठी योग्य आहारतज्ञ किंवा आपले डॉक्टर यांचा सल्ला घ्यावा .कधीकधी वजन कमी करण्यासाठी काही लोक वजन कमी करण्याचे औषध किंवा काही पावडर,पट्टे अशा अनेक साधनांचा अवलंब करतात परंतु या गोष्टी वापरून कमी केलेले वजन हे काही काळासाठी कमी करण्यात मदत करते. काही दिवसांनी परत वजनात वाढ होते आणि कधीकधी त्याचे दुष्परिणाम सुद्धा होतात. तेव्हा नैसर्गिकरित्या आहारात बदल आणि योग्य मार्गदर्शनाखाली केलेला व्यायाम यामुळे जे वजन कमी होते ते नेहमी चांगले. काही अभ्यासात असे आढळले आहे कि वजन हे योग्य प्रमाणात कमी केल्याने किंवा नियंत्रणात ठेवल्याने मधुमेहावर आपण लवकर नियंत्रण मिळवू शकतो. मधुमेह असणाऱ्या व्यतींनी वजन कमी करताना जेवढी गरज आहे तेवढेच वजन कमी करण्याचे उद्दिष्ट्य ठेवावे आणि त्यासाठी योग्य सल्ला डॉक्टरकडून घ्यावा. जास्त वजन सल्ला न घेता कमी केल्याने इतर समस्या उदभवू शकतात.

मधुमेह आणि व्यसन

मधुमेह असणाऱ्या व्यक्ती जर व्यसनाधीन असतील तर ते त्यांच्यासाठी जास्त धोकादायक ठरू शकते. कधीकधी असे पाहण्यात आले आहे कि काही लोक खूप जास्त प्रमाणात मद्य पिणे,सिगारेट घेणे,तंबाखूचे जास्त सेवन करणे अशा गोष्टी करत असतात आणि हे व्यसन ते आपल्या डॉक्टर पासून लपवतात किंवा त्यांना ते सांगताना लाज वाटते आणि ते सांगत नाहीत.पण व्यसन डॉक्टर पासून लपवणे खूप चूकचे आहे, कोणतीही छोटी गोष्ट असली तरी ती डॉक्टरांना सांगणे हे रुग्णाचे कर्तव्य आहे कारण आपण सांगिलेल्या माहितीच्या आधारे आणि डॉक्टरांनी केलेल्या परीक्षणातून ते आपल्यावर उपचार आणि मार्गदर्शन करत असतात जर आपण या गोष्टी लपवल्या तर आरोग्यामधे गुंतागुंत वाढते. काही प्रमाणात मद्यपान कधीतरी करणे चालू शकते पण यासाठी एक प्रमाण हवे प्रमाणाबाहेर मद्यपान केले तर मधुमेह वाढू शकतो.

मधुमेह आणि योग्य पाठपुरावा

मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी नेहमी डॉक्टरांशी संपर्क ठेवणे गरजेचे आहे तसेच डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे वेळोवेळी निदान करून घेणे हे खूप आवश्यक आहे. एखाद्या विशिष्ट काळानंतर डॉक्टरांकडून चेकअप करणे अनिवार्य आहे. जेव्हा आपण डॉक्टरकडे जाऊन चेकअप करतो तेव्हा आपल्या वेगवेगळ्या निदान चाचण्या केल्या जातात त्या केल्यामुळे आपल्याला मधुमेहाबद्दल सखोल माहिती मिळते तसेच मधुमेहामुळे इतर शरीराच्या अवयवांवर काही परिणाम झाला आहे का ?? ते देखील समजते आणि आपल्या शारीरिक बदलानुसार आपले डॉक्टर उपचारामध्ये बदल करतात,त्यामुळे शरीराच्या इतर अवयवांवर होणारा दुष्परिणाम टाळता येतो किंवा दुष्परिणाम कमी होण्यास मदत होते. पूर्वी मधुमेहासाठी रक्त तपास आणि लघवी तपास अशा काही ठराविक चाचण्या उपलब्ध होत्या परंतु आता या चाचण्याबरोबर टेकनॉलॉजी विकसित झाल्यामुळे खूप आधुनिक चाचण्यांची यात भर पडली आहे,ज्यामुळे डॉक्टर आता अधिक चांगल्याप्रकारे मधुमेहाचे निदान करू शकतात.

वरील काही महत्वाचे मुद्दे आहेत जे सर्वाना सहज अंमलात आणणे शक्य आहेत आणि याचा वापर आपण दैनंदिन जीवनात सतत केला तर आपण खूप प्रमाणात मधुमेह हा आजार नियंत्रित ठेवून एक उत्तम आयुष्य जगू शकतो चला तर मग आजपासूनच आपण हे छोटे बदल करूया "शुभस्य शिग्रम"

धन्यवाद,

स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि हसत राहा
Go Back

Make Appointment

Do you find the process of getting examined intimidating?
Choosing a right clinic for the matter, Let us take care of everything.