दिवाळी किंवा दीपावली हा एक प्रमुख हिंदू सण आहे.दीपोत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. या सणाला घरात व घराबाहेर तेलाचे दिवे लावले जातात. उंच जागी आकाशकंदिल लावला जातो. घराबाहेर रांगोळी काढून सुशोभन केले जाते. अंधार दूर करून प्रकाश निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. त्याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो. दीपावलीचे मूळचे नाव यक्षरात्री असे होते हे हेमचंद्राने नोंदवले आहे.
दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे वेगळे वेगळे महत्व आहे ते थोडक्यात आपण जाणून घेऊया.
वसुबारस:
आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस, वसुबारस हा सण साजरा केला जातो.भारताची संस्कृती कृषिप्रधान असल्याने या दिवसाचे महत्त्व विशेष आहे. या दिवशी संध्याकाळी गाईची पाडसासह पूजा करतात.ह्या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरुवात होते
धनत्रयोदशी:
आश्विन कृष्ण त्रयोदशीस धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो.आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा आहे. वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीची (देवांचा वैद्य) पूजा करतात.हा दिवस भारतात राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणूनही साजरा होतो.
नरक चतुर्दशी:
नरक चतुर्दशी या सणाशी संबंधित नरकासुरवधाची आख्यायिका प्रचलित आहे. या दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध करून प्रजेला त्याच्या जुलुमी राजवटीतून सोडवले. या दिवशी अभ्यंगस्नानाचे महत्त्व असते. सकाळी लवकर उठून, संपूर्ण शरीरास तेलाचे मर्दन करून, सुवासिक उटणे लावून, सूर्योदयापूर्वी केलेले स्नान म्हणजे अभ्यंगस्नान.
लक्ष्मीपूजन:
आश्विन अमावास्याआश्विन अमावास्येस लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो.या दिवशी प्रदोषकाळी (संध्याकाळी) लक्ष्मीचे पूजन केले जाते. लक्ष्मी ही फार चंचल असते असा समज आहे.त्यामुळे, शक्यतोवर हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे, लक्ष्मी स्थिर रहावी म्हणून करतात.
बलिप्रतिपदा:
हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून ही ओळखतात, या दिवशी बळी राजाचे रांगोळीने चित्र काढतात व त्याची पूजा करतात आणि ‘इडा पीडा टळो व बळीचे राज्य येवो’ असे म्हणतात. साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे.
भाऊबीज:
कार्तिक शुद्ध द्वितीयेस भाऊबीज हा सण साजरा केला जातो.या दिवशी यम आपली बहीण यमी हिच्या घरी जेवायला गेला म्हणून या दिवसाला “यमद्वितीया” असे नाव मिळाले असे मानले जाते. बंधु-भगिनींचा प्रेमसंवर्धनाचा हा दिवस आहे. भाऊ ‘ओवाळणी’ देऊन बहिणीचा सत्कार करतो. भावा-बहिणीच्या नात्याचा एक तरी सण प्रत्येक समाजात असतोच.
यंदाची दिवाळी आपण थोडी वेगळ्या पद्धतीने साजरी करायचा प्रयत्न करूया.आपण तंदुरुस्त असाल तरच सणांचा आनंद घेऊ शकतो.तेव्हा व्यायाम,मॉर्निंग वॉक किंवा योगा हे नियमित चालू ठेवा त्यात खंड पडू देऊ नका. दिवाळीत आहार आणि फिटनेस दोन्ही पाळुन आपला आनंद द्विगुणित करा.दिवाळी म्हणजे बरेच स्वादिष्ट पदार्थ आणि ते खाणे कोणीही टाळू शकत नाही.आपल्या आवडत्या पदार्थांपासून दूर राहू नका,पण डाएटची आठवण ठेवा.बाहेरील खाद्यपदार्थ आणि मिठाई खरेदी करण्याचा आणि खाण्याचा मोह शक्यतो टाळा घरी बनवलेले पदार्थ खा जेणेकरून तब्बेत चांगली राहील . जुने कपडे टाकून न देता,ज्यांना गरज आहे त्यांना दान करा. जेवढी शक्य आहे तेवढी मदत विविध आश्रमात(अनाथ ,वृद्ध) किंवा चॅरिटेबल ट्रस्ट मध्ये करा जेणेकरून समाजाप्रती थोडी मदत आपल्याकडून होईल.या धनत्रयोदशी आपण नवीन वस्तु खरेदी कराल त्याबरोबर प्रत्येकाने एक वृक्षारोपण देखील करा जेणेकरून निसर्गाला जपण्यास मदत होईल.लहान मुलांबरोबर जमलं तर कंदील घरी बनवा त्यात एक वेगळीच मज्जा असते.फटाक्यांच्या धुरापासून दूर रहा,आवाज न करणारे फटाके थोडेच लावा जेणेकरून प्रदूषणात जास्त वाढ होणार नाही. आपल्या प्रियजनांबरोबर दिवाळीचा आनंद घ्या.