योगा आणि निरोगी आरोग्य
तुम्हाला जर तुमची जीवनशैली उत्कृष्ट हवी असेल तर आपल्या आयुष्यात योगाचा समावेश करून घ्या. योगा केल्यामुळे आपलं शरीर नेहमी निरोगी आणि चांगलं राहातं. मात्र योगा करत असताना याच्या नियमांचं पालन करणंही आवश्यक आहे. योगा आपलं शरीर तंदुरूस्त राखण्यास मदत करतो. त्यामुळे आपल्या आयुष्यात नक्की योगाचं काय महत्त्व आहे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. इतकंच नाही तर कोणती आसनं रोजच्या धावपळीच्या आयुष्यातही तुम्ही करू शकता हेदेखील आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
योगाचे महत्त्व –
योगा खरंतर प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाचं आहे. हा केवळ एक व्यायामाचा प्रकार नाही तर, यामुळे तुमच्या शरीराला एक योग्य कसरत होते. सध्याच्या धावपळीच्या जीवनात बाकी सगळं मिळतं पण आपण स्वतःच्या शरीराकडे अर्थात आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करत आहोत. व्यायामाचे, योगाचे आपल्या आयुष्यात खूपच महत्त्व आहे. रोज योगा केल्याने ताणतणावपासून दूर राहतो. इतकंच नाही तर माणसाचे वजन, हाडं, मांसपेशी आणि सांधेदेखील दणकट राहातात. योगामुळे शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते. शिवाय तुम्ही नियमित योगा केलात तर कोणत्याही आजारापासून तुम्ही दूर राहू शकता. पण त्यासाठी तुम्हाला ही गोष्ट नियमित करणं आवश्यक आहे. योगामुळे रक्तदाबदेखील नियंत्रणात राहातो. त्यामुळे योगा हा बऱ्याचशा आजारांना दूर ठेवतो जे जास्त महत्त्वाचं आहे.
योगा करण्याची योग्य पद्धत
ध्यान –
काही मिनिट्स तुम्ही ध्यान लावून बसलात की, तुमच्या मन आणि शरीरामध्ये शक्तीचा संचार होतो. सकाळीच ध्यान केल्यामुळे तुमचं मन एका विशिष्ट दिशेने कार्यरत राहतं. तसंच पूर्ण दिवस तुमचं मन एकाग्र, शांत आणि संतुलित राहातं. शिवाय दिवसभराच्या तणावपासून दूर राहण्यास मदत होते.
नाडी शोधन प्राणायम –
आपल्या शरीरातील अशुद्धी दूर करण्यासाठी योगामध्ये नाडी शोधन प्राणायम करण्यात येतं. प्राणायमप्रमाणेच यामध्ये दीर्घ श्वास घेऊन सोडायचं असतो. हा योगप्रकरा अनुलोम – विलोम या नावानेदेखील ओळखला जातो. शरीरासाठी अतिशय फायदेशीर असं हे प्राणायम आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या श्वासावर नियंत्रण ठेवण्याची कसब येते.
शलभासन –
बऱ्याच व्यक्तींना पाठ आणि कमरेचा खूपच त्रास असतो. विशेषतः महिलांना. गरोदरपणानंतर तर हा त्रास सर्रास होतो. या आसनामुळे तुमच्या कंबर आणि पाठीचे स्नायू मजबूत होतात. शिवाय तुमच्या पाठीमध्ये आणि कंबरेत कोणत्याही स्वरूपाचा त्रास होत असेल तर हे आसन तुम्ही रोज करायला हवं. हे रोज करून तुम्हाला स्वतःलाच स्वतःमधील बदल जाणवेल.
भुजंगासन –
तुमची छाती आणि तुमच्या शरीरातील मांसपेशी लवचिक बनवण्यासाठी आणि कंबरेत आलेला तणाव दूर करण्यासाठी हे आसन अप्रतिम आहे. मेरूदंडसंबंधित आजारी व्यक्तींनी हे आसन केल्यास, त्याना याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. शिवाय महिलांमध्ये गर्भाशयातील रक्ताभिसरण प्रक्रिया नियंत्रित करण्यासाठीदेखील या आसनाची मदत होते.
अर्धचक्रासन –
तुम्हाला मधुमेह अथवा साखरेचा कोणताही आजार वा पोटावरील चरबीपासून सुटका हवी असेल तर अर्धचक्रासन हा उत्कृष्ट पर्याय आहे. याबरोबर हेदेखील लक्षात ठेवा की, ज्या व्यक्तींना हाडासंबंधी कोणतीही गंभीर तक्रार असेल, त्या व्यक्तींनी हे आसन अजिबात करू नये आणि ज्या व्यक्तींना रक्तदाब अथवा मानसिक कोणताही आजार असेल त्यांनीही या आसनापासून दूरच राहावं. केवळ मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी या आसनाचा उपयोग होतो.
नियमित योगा करण्याचे फायदे
शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी योगा हा अत्यंत योग्य उपाय आहे. नियमित योगा केल्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य वाढतं. तुम्ही आजकालच्या धावपळीच्या जीवनात स्वतःला फिट ठेऊ इच्छित असाल तर योगा हा नक्कीच चांगला उपाय आहे. पाहूया काय आहेत योगा करण्याचे फायदे –
ताणतणावपासून मुक्ती –
आजकालच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकालाच तणाव असतो. पण नियमित योगा केल्यास, या ताणतणावपासून तुम्हाला मुक्ती मिळू शकते. तुम्ही सकाळी उठून रोज प्राणायाम आणि मेडिटेशन करत असाल तर तुम्हाला पूर्ण दिवस एनर्जी मिळते आणि तुमच्यामध्ये उत्साह कायम राहतो.
शरीरातील साखरेवर नियंत्रण –
आजकाल लहान वयातदेखील लोकांना मधुमेह झालेला ऐकायला मिळतो. शरीरामधील इन्सुलीनचं प्रमाण घटलं की, साखरेचं प्रमाण वाढतं. मात्र रोज योगा केल्यामुळे साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी –
आजकाल खाण्याच्या पद्धती इतक्या बदलल्या आहेत की, त्याचा परिणाम शरीर लठ्ठ होण्यावर होत असतो. बऱ्याच जणांना ही समस्या असते. पण योगा केल्यामुळे तुमचं वजन नियंत्रणात राहातं. योगामध्ये अशी अनेक आसनं आहेत ज्यामुळे तुमची पचनक्रिया योग्य राहते आणि तुमच्या शरीरामध्ये चरबी साठू शकत नाही.
रक्ताभिसरण चांगलं होतं –
योगामुळे शरीरातील रक्ताभिसरण वेगाने होण्यास मदत होते. शिवाय सर्वच अवयवांना योग्य व्यायाम मिळतो. यामुळे श्वासोच्छवास योग्य तऱ्हेने घेतला जातो आणि रक्ताभिसरण प्रक्रिया अप्रतिम होते
म्हातारपणात आरोग्याच्या समस्या टाळण्यासाठी –
तरूणपणी शरीर आपल्याला योग्य साथ देत असतं. कारण त्यावेळी कितीही आजार आला तरीही प्रकृती साथ देते. पण जसं वय वाढतं तशा तक्रारीही वाढतात. शरीरावरही मर्यादा येतात. त्यामुळे तुम्ही सुरुवातीपासूनच जर योगा करत असाल तर तुम्हाला म्हातारपणात आरोग्याच्या कमी समस्यांना सामोरं जावं लागतं.
योगा करत असताना लक्षात ठेवायच्या गोष्टी
निरोगी शरीर देणारा योगा आपण करण्यापूर्वी आणि करत असताना नक्की कोणत्या खास गोष्टी करायला हव्यात याची माहिती करून घेणंही गरजेचं आहे. जाणून घेऊया योग करत असताना तुम्हाला कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी.
- योगा करत असताना मध्येच अजिबात पाणी पिऊ नये. असं केल्यास, तुम्हाला अलर्जी, सर्दी, खोकला अथवा कफ अशा तऱ्हेच्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं.
- योगा हा नेहमी सकाळी रिकाम्या पोटी आणि पोट साफ झाल्यानंतरच करायला हवा. अन्यथा योगा केल्याचा कोणताही फायदा तुम्हाला होणार नाही.
- योग करत असताना तुम्ही शरीरावर कमीत कमी आणि सैलसर कपडे घाला. त्यामुळे तुम्हाला स्वतःला हलकं वाटेल. शरीरामध्ये कोणताही जडपणा आणि ताण तुम्हाला त्यामुळे जाणवत राहणार नाही.
- योगा नेहमी मोकळ्या आणि स्वच्छ जागीच करावा. उन्हाळ्यात तुम्ही तुमच्या बाल्कनी अथवा बागेमध्ये योगा करू शकता आणि हिवाळ्यात तुम्ही अशी रूम शोधा जिथे मोकळी हवा आणि चांगला उजेड येत असेल. पावसाळ्यातही तुम्ही अशाच रूमचा वापर करा.
- योगा करताना सर्वात पहिले सोप्या आसनाने सुरुवात करावी आणि मग कठीण आसन करावं हे नेहमी लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला कधीही थकवा येणार नाही आणि शरीरालादेखील आराम मिळेल.
- योगा हा नेहमी एखाद्या तज्ज्ञांंच्या देखरेखीखालीच करावा किंवा तुम्हाला याचा पहिला अनुभव असेल तर तुम्ही योगा करा. चुकीचं आसन करण्यामुळे कंबरदुखी, गुडघेदुखी अथवा तुमच्या मसल्समध्ये दुखापत होण्याची शक्यता निर्माण होते.
- योगा नेहमी अशा जागी करावा जिथली जमीन सपाट असते. बेड अथवा सोफ्यावर बसून योगा करणं हे कधीही योग्य नाही.
- योगा केल्यामुळे शरीरामध्ये खूपच उष्णता निर्माण होते त्यामुळे योगा केल्यावर लगेच आंघोळ करू नये. त्यामुळे तुमच्या शरीरावर चुकीचा परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे योगा केल्यावर एक तासाने आंघोळ करावी हे नेहमी लक्षात ठेवा.
- नियमित स्वरूपात तुम्ही कोणतंही आसन करत असल्यास, तुम्हाला शरीरामध्ये कोणताही ताण अथवा दबाव निर्माण झाल्याचं जाणवत असेल तर हे आसन करू नका. तसंच याबाबत तुमच्या ट्रेनरला नक्की सांगा.
- तुम्हाला अंगात ताप असेल अथवा कोणत्याही दुसऱ्या एखाद्या आजाराने त्रस्त असाल तर तुम्ही त्या दिवशी योगा करू नये. तसंच मासिक पाळीदरम्यान तुम्हाला जास्त रक्तस्राव होत असल्यासही योगा करू नये.