नमस्कार,
डायबेटीस असणाऱ्या रुग्णांनी आपल्या डोळ्यांची विशेष काळजी घेणे गरजेचे असते,कारण डायबेटीस मुळे डोळ्यांना इजा होण्याचा धोका असतो परंतु आपण जर नियमित डोळ्यांची निगा राखली तर हे टाळता येते .आज आपण चर्चा करूया डायबेटिक रेटिनोपॅथी या विषयी.
डायबेटीस रेटिनोपॅथी म्हणजे काय?
डायबेटिस पेशंटमध्ये बहुतांश वेळेस डायबेटिक रेटिनोपॅथी हा डोळ्यांचा विकार आढळतो. डायबेटिस पेशंटमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यास त्याचा परिणाम डोळे, किडनी, हृदय इत्यादी अवयवांवर होतो. खासकरून डोळ्यांच्या मागील पडद्यावरील रक्तवाहिन्यांवर परिणाम होऊन दृष्टी अंधूक होते. त्यामुळे आयुष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
डायबेटीसचा डोळ्यांवर कसा परिणाम होतो?
डोळ्याच्या मागील भागात दृष्टीपटलावरील रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. रक्त साकळल्याने डोळ्याचा पडदा अंधुक होतो. डोळ्याच्या पडद्याला सूज येऊन मधला भाग सुजतो. त्याची कल्पना येण्यास उशीर झाल्याने दृष्टीचे नुकसान होते.
डायबेटिक रेटिनोपॅथीची लक्षण कोणती?
खालील वैशिष्ट्ये डायबेटिक रेटिनोपॅथी दर्शवितात –
- १) धूसर दृष्टी
- २) दृष्टीदोष
- ३) आपल्या दृष्टीक्षेपात फ्लोटिंग स्पॉट किंवा गडद स्ट्रिंग्स
- ४) चढउतार दृष्टी
- ५) आपल्या दृष्टीक्षेपात गडद किंवा रिकामे क्षेत्र
- ६) खराब रंग दृष्टी
- ७) डायबेटिक रेटिनोपॅथी कोणतीही शारीरिक लक्षणे दर्शवत नसेल तरीही रुग्णांमध्ये उपस्थित असू शकते.
उपचारापेक्षा काळजी घेणे नेहमी चांगले?
नियंत्रित मधुमेहाच्या बाबतीत डायबेटिक रेटिनोपॅथी होण्याची शक्यता कमी होते. हे काही उपाय आहेत जे मधुमेहाच्या रेटिनोपॅथीपासून बचाव करण्यासाठी मदत करू शकतातः
- १) रक्तातील साखरेची पातळी, कोलेस्टेरॉलची पातळी आणि रक्तदाब नियंत्रित ठेवा. या सर्व स्तरांची नियमितपणे तपासणी करा.
- २) मधुमेह तज्ञ आणि नेत्रतज्ज्ञांची नियमित भेट. जर आपण फ्लोटर्स पाहणे सुरू केले किंवा अस्पष्ट दृष्टी मिळाल्यास डोळ्यांच्या तज्ञास त्वरित भेट द्या.
- ३) जास्त प्रमाणात मीठ, चरबी आणि साखरयुक्त खाद्यपदार्थ टाळा.
- ४) फायबरयुक्त समृद्ध आहार घ्या आणि नियमित व्यायामाद्वारे निरोगी वजन टिकवा.
- ५) धूम्रपान सोडा आणि अल्कोहोलचे सेवन कमी करा
डायबेटीस रुग्णांनी डोळ्यांची वार्षिक तपासणी का केली पाहिजे ?
बऱ्याचदा डायबेटीस रुग्ण हे फक्त डायबेटीस वर आणि त्याच्या उपचारांवर जास्त लक्ष देतात परंतु डोळ्यांकडे कळत नकळत थोडे दुर्लक्ष होते.डायबेटीसमुळे डोळ्यांचे गंभीर आजार आणि काही वेळा अंधत्वही येऊ शकते.डायबेटीसचा आपल्या डोळ्यांवर काही परिणाम होतो आहे का हे जाणून घेण्यासाठी वर्षातून एकदा तरी डोळ्यांची सर्वसमावेशक तपासणी आवश्यक आहे. नियमित तपासणी केल्याने डोळ्याची योग्य काळजी घेतली जाऊ शकते जेणेकरून पुढील मोठया आजारांपासून बचाव करता येतो.
तर मित्रांनो आज आपण जाणून घेतलं डायबेटीस रुग्णांनी डोळ्यांची कशी निगा राखली पाहिजे,डोळ्यांची नियमित तपासणी का महत्वाची आहे आणि डायबेटीस रेटिनोपॅथी म्हणजे काय ,हा विकार होऊ नये म्हणून आपण कोणत्या उपाययोजनांचा अवलंब केला पाहिजे.