नमस्कार,
सर्वांना जागतिक हास्य दिवसाच्या शुभेच्छा
कधीकधी दिवस अधिक चांगला बनविण्यात ज्याची मदत होते ते म्हणजे हास्य,कोणी साधं कौतुक केलं ,दोन शब्द प्रेमाने आपुलकीने बोलले तरी चेहऱ्यावर एक स्मित हास्य आपोआप येते आणि चांगल वाटत. मित्रानो आज २ ऑक्टोबर हा दिवस सर्व जगात हास्य दिवस म्हणून साजरा करतात. या दिवसाचे महत्व, हा दिवस का साजरा केला जातो , हा दिवस कसा तयार झाला, कोणी हा दिवस साजरा करण्याची सुरुवात केली हे आपण आज थोडक्यात जाणून घेऊया.
जागतिक हास्य दिनाचा इतिहास
एक अमेरिकन व्यावसायिक कलाकार आणि प्रसिद्ध आर्टिस्ट ” हार्वे रॉस बॉल ” यांनी जगातील सर्वात पहिले हास्य चिन्ह तयार केले आणि आता आधुनिक काळात आपण त्याला ईमोजी म्हणतो.हे चिन्ह तयार केल्यानंतर त्या चिन्हाचे फक्त व्यापारीकरण होऊ नये असे त्यांना वाटले म्हणून त्यांनी जागतिक हास्य दिवस म्हणजेच “World Smile Day” ची निर्मिती केली.हा दिवस वंश, लिंग किंवा भौगोलिक स्थान याची पर्वा न करता सर्व ठिकाणी प्रेम आणि आनंद व्यक्त करता यावा यासाठी सुरु करण्यात आला. हार्वे बॉल यांनी वर्ल्ड स्माईल फाउंडेशन ची स्थापना केली आणि या फाउंडेशन मार्फत हास्य दिवस साजरा करायची सुरुवात सर्वप्रथम झाली.
जागतिक हास्य दिवस कसा साजरा केला जातो
या दिवशी सर्व ठिकांणी विविध हास्याचे कार्यक्रम आयोजित केले जातात . सर्व लोक एकमेकांना शुभेच्छा देतात. सर्व जण या दिवशी एकमेकांना आनंद देण्याचा प्रयत्न करतात. विनोदी कविता, विनोदी चित्रपट, नाटक,हास्य संमेलन इ कार्यक्रम आयोजित केले जातात. शाळा,ऑफिस,कॉलेज इ. ठिकाणी हास्याचे महत्व सांगितले जाते. अश्या विविध पद्धतीने हा दिवस उत्स्फूर्तपणे साजरा केला जातो. यावर्षी कोविड साथीमुळे बऱ्याच लोकांनी हा दिवस ऑनलाईन तंत्राचा वापर करून साजरा करण्याचे ठरविलं आहे,अस जनमानसातील चर्चामधून समजते.
हास्य का महत्वाचे आहे आणि याचे प्रमुख फायदे कोणते?
हसतमुख राहिल्याने आरोग्य सुधारते. संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की जेव्हा लोक हसत असतात तेव्हा एंडोफिन तयार होते आणि ज्यामुळे लोकांना आनंद होतो व तणाव कमी होतो. जितके जास्त तुम्ही हसता तितके आनंदी व्हाल. आता आपण जाणून घेऊ हास्याचे काही फायदे
हास्य मूड चांगला ठेवते –
जेव्हा आपण निराश होत असता तेव्हा स्वत:ला हसवल्यामुळे आपली मनःस्थिती सुधारण्यास मदत होते आणि सकारात्मक विचार वाढतात. म्हणून, जर तुमचा दिवस खराब होत असेल तरीही हसण्याचा प्रयत्न करा,यामुळे आपला उत्साह वाढेल.
कमी रक्तदाब नियंत्रित राहातो –
हसणे आपला रक्तदाब कमी करण्यास मदत करते जे आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असते.हसण्यामुळे हृदयाच्या गतीमध्ये प्रारंभिक वाढ होते ,त्यानंतर स्नायू विश्रांती घेतात आणि हृदय गती व रक्तदाब कमी होतो, ज्यामुळे हृदयरोग होण्याचा धोका कमी होण्यास मदत होते.
ताण तणाव कमी होतो –
बऱ्याचवेळा हसल्याने आपल्या शरीराला तणावपूर्ण परिस्थितीस अधिक प्रभावीपणे सामोरे जाण्यास मदत होते. तणावपूर्ण कार्यात हसण्यामुळे हृदयाची गती कमी होते. तणाव सहसा हृदयाची गती आणि रक्तदाब वाढवतो. म्हणून, ताणतणाव असताना स्मित हास्य राखणे आपल्याला मानसिक आणि शारीरिक दोन्ही फायदे प्रदान करते.
प्रतिकार शक्ती वाढवते –
यावर विश्वास ठेवा किंवा नाही, हास्य आपल्या शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीस चालना देण्यात मदत करते. हास्य आणि सकारात्मक विचारांमुळे आपल्या मेंदूत असलेला तणाव कमी होतो व आजारांशी झुंज देणारी रोगप्रतिकारक कार्यान्वयीत होते.
वेदना कमी करते –
हस्यामुळे आपल्या शरीरात नैसर्गिक पेनकिलर तयार होते.सामाजिक हास्यामुळे आपल्या वेदनां कमी होतात , यामुळे वेदनासहन करण्याची ताकद निर्माण होते. म्हणूनच, एखाद्या दुखापतीमुळे, आजारपणामुळे किंवा जुनाट आजारामुळे आपण दु:खी असाल तर एक मजेदार चित्रपट पहा, विनोदी कार्यक्रमात हजेरी लावा किंवा मित्र आणि कुटूंबासह वेळ व्यतीत करा.
दीर्घ आयुष्य –
हसतमुख आणि सकारात्मक भावना आयुष्याच्या वाढीशी संबंधित आहेत.असं म्हणतात हसल्याने आयुष्य वाढते म्हणून हसत राहा आणि कायम सकारात्मक विचार करत राहा.
तर मित्रानो आता समजल ना हास्य आपल्या आयुष्यत किती महत्वपूर्ण भूमिका बजावते. चला तर मग आज पासून नेहमी कायम एकच गोष्ट लक्षात ठेवा कितीही संकटे आली, निराशेचे क्षण आले तरी आपण न डगमगता, हार न मानता नेहमी हसत राहा.