कोलेस्टेरॉल कमी करण्याचे सोपे उपाय
नमस्कार,
असं म्हणतात “हृदय चांगला असेल तर आरोग्य चांगल राहते” आणि ” हृदय चांगलं ठेवण्यासाठी कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवणे खूप आवश्यक आहे”. ICMR च्या मागील अभ्यासानुसार असे लक्षात येते कि ७०% भारतीय लोकांचे कोलेस्टेरॉल नियंत्रणात नाही. चला तर मग आपण आता आपल्या विषयाकडे वळूया.
प्रश्न क्र. १: कोलेस्टेरॉल म्हणजे काय आणि कोलेस्टेरॉल जास्त असेल तर काय दुष्परिणाम होतात ?
उत्तर : आपण जे अन्न खातो त्याची प्रक्रिया होऊन यकृतामधे एक रसायन तयार होते त्याला कोलेस्टेरॉल असे म्हणतात. कोलेस्टेरॉल हे आपल्या शरीरातील सर्व पेशींचे आवरण,संप्रेरके आणि व्हिटॅमिन “D” तयार करण्यासाठी उपयुक्त असते.जर शरीरातील कोलेस्टेरॉल जास्त असेल तर रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊन हृदय विकार,अर्धांगवायू (पक्षाघात) ई आजार होऊ शकतात.
प्रश्न क्र.२ : चांगले कोलेस्टेरॉल आणि वाईट कोलेस्टेरॉल मधील फरक काय?
उत्तर : HDL (HIGH DENSITY LIPPPROTIN) चांगले कोलेस्टेरॉल आणि LDL (LOW DENSITY LIPPPROTIN) वाईट कोलेटेरॉल. या दोन्ही पातळी लिपिड प्रोफाइल या रक्तचाचणी मधे समजते म्हणून डॉक्टर कोलेटेरॉल रुग्णांना हि चाचणी करण्यास सांगतात.
प्रश्न क्र ३: HDL आणि LDL कोलेस्टेरॉलची पातळी जास्त किंवा नॉर्मल कोणती हे कसं समजतं ?
HDL कोलेस्टेरॉलचे प्रमाण ५० ते ६० पेक्षा जास्त असणे चांगले, ४० mg/dL पेक्षा कमी असेल तर हृदय विकाराचा धोका निर्माण होतो.
LDL कोलेस्टेरॉलचे प्रमाण १०० mg/dL पेक्षा कमी असणे चांगले, १०० mg/dL पेक्षा अधिक असेल तर हृदय विकाराचा धोका निर्माण होतो.
ट्रायग्लिसराईडची नॉर्मल पातळी १५० mg/dL पेक्षा कमी असावी. ट्रायग्लिसराईड २०० mg/dL पेक्षा जास्त असेल तर त्यामुळे हृदयविकार ,पक्षाघात (अर्धांग वायू) असे गंभीर आजार होतात. ट्रायग्लिसराईड हा कोलेस्टेरॉल प्रकार मधुमेह, वजन जास्त असणाऱ्या रुग्णांमध्ये वाढलेला अढळतो.
प्रश्न क्र ४: शरीरात कोणत्या कारणामुळे कोलेस्टेरॉल वाढू शकते?
उत्तर : जास्त प्रमाणात लाल मांस खाणे,दुग्धजन्य पदार्थ,तळलेले पदार्थ यांचे सेवन करणे. धूम्रपान व मद्यपानाचा अतिरेक. त्याच प्रमाणे ज्यांना मधुमेह, रक्तदाब किंवा हायपो थायरॉईड ई. समस्या आहेत त्यांच्या मध्ये सुद्धा कोलेटेरॉल वाढलेले आढळले आहे. कधीकधी अनुवांशिकता हे देखील कारण आहे
प्रश्न क्र ५: आपण कशाप्रकारे कोलेस्टेरॉल कमी करू शकतो ?
उत्तर : तेलकट पदार्थ आणि मिठाचे प्रमाण आहारात कमी करणे,मांसयुक्त पदार्थ कमी खाणे,दुधाचे पदार्थ कमी खाणे. त्याचप्रमाणे रोज व्यायाम करणे, ३० ते ४० मिनिटे चालणे, फळे पालेभाज्या जास्त प्रमाणात खाणे, व्यसनापासून दूर राहणे. ई गोष्टी नियमित केल्याने आपल्याला कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत होईल.
प्रश्न क्र ६: कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी कोणती औषधे घेण्याचा सल्ला रुग्णांना डॉक्टर देतात?
उत्तर : सामान्य रुग्णांमध्ये जर आहाराचे योग्य व्यवस्थापन आणि व्यायाम यामुळे कोलेस्टेरॉल नियंत्रणात आले नाही तर डॉक्टर स्टॅंटिन्स नावाचे औषध देतात. काही रुग्णांमध्ये स्टॅंटिन्स सुरुवातीपासून देतात. काही निवडक रुग्णांमध्ये इझंटिमीबे आणि फिब्राट्स हि औषधे देतात
प्रश्न क्र ७: एकदा रुटीन चेकअप मधे माझी कोलेस्टेरॉल पातळी जास्त आली आहे पण मला काही त्रास नाही म्हणून मी उपचार केले नाही यावर आपले काय मत आहे डॉक्टर?
उत्तर : ज्याप्रमाणे रक्तदाब आणि मधुमेहामधे बऱ्याच रुग्णांमध्ये लक्षणे दिसत नाहीत त्याचप्रमाणे कोलेस्टेरॉल मधेसुद्धा लक्षणे दिसत नाहीत. आणि लक्षण दिसले नाही म्हणून रुग्ण त्यावर उपचार घेत नाहीत आणि नंतर मोठ्या संकटाना सामोरे जावे लागते. म्हणून कोलेटेरॉल अधूनमधून तपासणे चांगले लक्षणे नसली तरीहि.
प्रश्न क्र ८: कोलेस्टेरॉलच्या औषधाचे कोणते दुष्परिणाम असतात का?
उत्तर : ज्या रुग्णांनी कोलेस्टेरॉल औषध घेतले त्यांच्यात कोणतेही मोठे दुष्परिणाम आढळून आलेले नाहीत. काही रुग्णांमध्ये स्नायू आखडणे किंवा थकवा येणे असे थोडे परिणाम दिसून आले. स्टॅंटिन्स औषध सुरु केल्यावर जर कोणाला त्रास जाणवला तर त्यांनी जे उपचार करणारे डॉक्टर आहेत त्यांना संपर्क करावा जेवेकरून काही त्रास असेल तर डॉक्टर तपासणी करून औषधाच्या प्रमाणात योग्य तो बदल करून देतील.
तर मित्रानो आज आपण कोलेस्टेरॉल विषयी काही महत्वपूर्ण गोष्टी जाणून घेतल्या तेव्हा आपले कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवा, डॉक्टरांचे योग्य मार्गदर्शन घ्या आणि स्वस्थ राहा पुन्हा भेटू एक नवीन विषय घेऊन.